Monday, June 8, 2026
Homeक्राईम न्यूज"मढ–डुंबरवाडी दरम्यानचा कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्ग (एनएच-६१)": "मृत्यूचा सापळा; राज्य व केंद्र शासन...

“मढ–डुंबरवाडी दरम्यानचा कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्ग (एनएच-६१)”: “मृत्यूचा सापळा; राज्य व केंद्र शासन कधी जागे होणार?

पुणे जिल्ह्यातील मढ ते डुंबरवाडी दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ (NH-61) हा वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या दोन वर्षांत या मार्गावर अनेक गंभीर व जीवघेणे अपघात घडले असून अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) व वाहतूक विभागाला तातडीने रस्ता सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, पूर्वी राज्य महामार्ग असलेला हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मात्र, त्यानुसार आवश्यक सुरक्षा सुविधा उभारण्यात आलेल्या दिसत नाहीत. अनेक ठिकाणी मध्यवर्ती डिव्हायडर नसल्याने समोरासमोर धडक होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

याशिवाय, रस्त्यालगत काही हॉटेल व्यावसायिकांनी मोठमोठे जाहिरात फलक (होर्डिंग्ज) उभारले असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः उदापूर–ओतूर परिसरातील हॉटेल आमंत्रण व हॉटेल वायकर यांच्या परिसरातील होर्डिंग्ज वाहनचालकांचे लक्ष विचलित करत असल्याची तक्रार आहे. रात्रीच्या वेळी या होर्डिंग्जच्या सावल्या रस्त्यावर पडत असल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन अपघातांचा धोका वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांना खालील मागण्या करण्यात आल्या आहेत:

•मढ –डुंबरवाडी मार्गाचा तातडीने रोड सेफ्टी ऑडिट करण्यात यावा.

• अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) ठिकाणे निश्चित करून आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात.

• डिव्हायडर, रंबल स्ट्रिप्स, रिफ्लेक्टर, चेतावणी फलक व इतर सुरक्षा उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात.

• राष्ट्रीय महामार्गालगत उभारण्यात आलेल्या होर्डिंग्जची कायदेशीरता तपासण्यात यावी.

• अनधिकृत व धोकादायक होर्डिंग्ज तसेच अतिक्रमणे त्वरित हटविण्यात यावीत.

• गेल्या दोन वर्षांतील अपघात, मृत्यू व जखमींची आकडेवारी जाहीर करून त्यावर उपाययोजना करण्यात याव्यात.

संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, या मार्गावरील धोकादायक परिस्थितीबाबत प्रशासनाला पूर्वसूचना देण्यात येत असून यानंतरही आवश्यक उपाययोजना करण्यात दुर्लक्ष झाल्यास भविष्यातील घटनांबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात येईल.

मानवी जीविताचे संरक्षण आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने लक्ष घालून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे

Issued For Public Interest by Ad. Anil Bugde, Advocate High Court, Mumbai.

Ad. Anil Bugde
Ad. Anil Bugdehttps://pil24news.com/
I am Ad. Anil Bugde, Activist Lawyer taking up Social Legal Issues concerning Larger Public Interest before the Forum of Public India, and also before the Court of Law and then mobilizing Human Power Organization to fight against all inhuman and insensitive approach of the mighty people and shady government agencies for the interest of Common Man, and also continuously striving for to see the Rule of Law is ensured or not in our Society.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments