स्वामी समर्थांची पूजा, वारकरी संप्रदाय करणाऱ्या सच्च्या सेवेकऱ्यांना तळमळीची विनंती —दर गुरुवारी होणाऱ्या महाआरती व महाप्रसादासाठी देणगी देणाऱ्या दानशूर व्यक्तींची नावे संस्था छापील हँडबिल, पोस्टर, लाऊडस्पीकर किंवा इतर प्रसिद्धी माध्यमांतून वारंवार जाहीर करते. हा देवपूजेचा आणि सेवाभावाचा उपयोग केवळ प्रसिद्धीसाठी तर होत नाही ना, असा प्रश्न अनेक खऱ्या भक्तांच्या मनात निर्माण होतो.
खरा दानशूर मनुष्य देवासाठी गुप्तदान करतो. परंतु आज अनेक ठिकाणी देणगीदारांचा मोठा उदोउदो केला जातो, तर निस्वार्थ भावनेने सेवा करणाऱ्या सामान्य सेवेकऱ्यांना दुय्यम वागणूक मिळाल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे भक्तीमय आणि पवित्र वातावरणात नकळत भेदभाव, अहंकार आणि प्रसिद्धीची स्पर्धा निर्माण होत नाही ना, याचा विचार होणे आवश्यक आहे.
आज स्वामी समर्थांची पूजा व त्याचबरोबर अखंड सप्ताह चालवणाऱ्या काही मंडळांमध्ये “भावपुष्प” देणाऱ्या आणि मोठ्या रकमेचे दान करणाऱ्या लोकांनाच विशेष महत्त्व दिले जाते, असे चित्र दिसून येते. अनेक तथाकथित दानशूर व्यक्ती केवळ आपले नाव प्रसिद्ध व्हावे, समाजात मान-सन्मान मिळावा यासाठी मोठी रोख रक्कम देतात. त्यानंतर त्यांच्या नावांचा मोठ्या थाटामाटात उल्लेख केला जातो आणि “भावपुष्प देणारे दानशूर” म्हणून त्यांचा गौरव केला जातो.
परंतु प्रश्न असा निर्माण होतो की, केवळ पैसा दिला म्हणूनच एखादी व्यक्ती खऱ्या सन्मानास पात्र ठरते का? दिवसभर कष्ट करून घाम गाळणारा, मनापासून देवसेवा करणारा सामान्य भक्त, गरीब सेवेकरी किंवा निस्वार्थ भावनेने काम करणारा माणूस यांनाही “भावपुष्प” देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. तळागाळातील भक्तांचा सन्मान झाला तरच देव खऱ्या अर्थाने आनंदी होईल.
सेवा ही देवासाठी असावी, प्रसिद्धीसाठी नव्हे. स्वामी समर्थांच्या नावाने होणाऱ्या प्रत्येक कार्यात नम्रता, समता आणि निःस्वार्थ भाव जपला गेला पाहिजे, अशीच अपेक्षा सर्व खऱ्या भक्तांची आहे.
“खरे भावपुष्प हे केवळ पैशातून नव्हे, तर जनकल्याणासाठी केलेल्या निःस्वार्थ समर्पणातून उमलते.”
— अॅडव्होकेट अनिल बुगडे उच्च न्यायालय, मुंबई


