मlझगाव बेंच कोर्टातील स्टेनो आणि न्यायाधीशांवरील लाच प्रकरणाचा पर्दाफाश
बॉम्बे सिटी सिव्हिल अँड सेशन्स कोर्ट, मुंबई येथील मझगाव बेंचमधील न्यायालय क्रमांक १४ मध्ये कार्यरत कोर्ट स्टेनो क्लर्क चंद्रकांत हनुमंत वासुदेव यांनी तक्रारदाराच्या कोर्टातील खटल्याचा निकाल त्यांच्या बाजूने देण्यासाठी तब्बल २५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
तक्रारदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित स्टेनोने सांगितले की १० लाख रुपये त्याच्यासाठी आणि उर्वरित १५ लाख रुपये त्या कोर्टाचे जिल्हा न्यायाधीश श्री. काजी साहेब यांच्यासाठी असतील. शेवटी चर्चेनंतर व्यवहार १५ लाखांवर ठरविण्यात आला.
तक्रारदाराने हा लाचेचा व्यवहार नाकारून थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली. एसीबीने सापळा रचून ११ नोव्हेंबर २०२५ रोजी कोर्ट स्टेनो चंद्रकांत हनुमंत वासुदेव यांना १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यानंतर या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या लाचेच्या व्यवहारास न्यायाधीश काजी यांनी मौन संमती दिल्याचे समोर आले असून, या प्रकरणात त्यांना आरोपी क्रमांक २ म्हणून नोंदविण्यात आले आहे. सध्या न्यायाधीश काजी फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी एसीबीकडून तीव्र तपास मोहीम सुरू आहे.
या घटनेमुळे न्यायव्यवस्थेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, न्यायालयीन यंत्रणेतील भ्रष्टाचाराच्या मुळावर प्रहार करण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे.
“जनहितार्थ व समाज प्रबोधनासाठी – अॅड. अनिल बुगडे, उच्च न्यायालय, मुंबई.”


